Pav Bhaji and Memories | पाव-भाजी आणि आठवणी
पाव-भाजी. अहाहा! नुसतं हे नाव जरी उच्चारलं तरी गरमागरम मस्का मारलेली भाजी आणि खमंग पाव नजरेसमोर येतात आणि कधी ती खातेय, असं होऊन जातं! बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि हो, त्याबरोबर देतात ती लाल तिखट चटणी, यामुळे पाव भाजीची लज्जत आणखी वाढते. कधीही कुठल्याही वेळी, अगदी पहाटे चारला पाव भाजी खाणारे माझ्या आसपास अनेक लोकं आहेत.
पाव भाजी हा फक्त पोट भरण्यासाठी खाल्ला जाणारा पदार्थ नाहीच मुळी, तर या पाव भाजीशी तुमचं एक वेगळचं नातं जुळतं. ते नातं विविध रूपांत तुम्ही पाहू शकता. अगदी मित्रांमधली प्रदीर्घ चर्चा चविष्ट करण्यासाठी तिचा आधार घेतला जातो, तर रविवारी काहीतरी चमचमीत खायचंय, नातेवाईक येणारेत म्हणून हमखास तीच केली जाते. इतकच काय, कुठल्याही सणाच्या वेळी सगळे एकत्र जमले, थकून भागून अनेक कामं केली की, भूक खवळते. मग नाक्यावरची पावभाजी आधार देते. मला तर या पाव भाजीची असंख्य रूपं माहिती आहेत.
त्या भाजीत असतं तरी काय, तर फ्लॉवर, बटाटा, कांदा, टोमॅटो आणि नावापुरती सिमला मिर्ची. हे सगळं नीट योग्य प्रमाणात एकत्र करताना त्यात आलं, लसूण, मीठ, तिखट आणि हो, पावभाजीचा मसाला चांगला असला की खरी मजा येते. काही ठिकाणी तर भाज्या कमी-जास्त असतात, पण मसाला मात्र परफेक्ट असतो. त्यामुळे त्या पावभाजीच्या रंगा-गंधाने तुमची पावलं नकळत पावभाजी खाण्याकडे वळली जातात. अर्थात, बटर जितके घालाल तितकं कमीच. अशी ही साधीशी करायला सोपी असली, तरी ती नेमकी जमणं सगळ्यात महत्वाचं असतं. ती जमली, तर आणि तरच तुमची पुढची मैफल अथिक चांगली रंगू शकते. ही भाजी घरी तर हमखास होतेच, पण ती गल्लीच्या नाक्यावर, हॉटेलमध्ये अशी सगळीकडेच मिळते.
मात्र, पावभाजी फक्कड कुठे मिळते? असं मला विचाराल, तर माझ्यासमोर अर्थात मुंबईच डोळ्यासमोर येईल. त्यात मी पक्की गिरगावकर. चाळीत बालपण गेलेली. त्यामुळे माझी नाळ पावभाजीशी तर अगदी घट्ट जुळलेली. आठवणी म्हणून तरी किती! गिरगावात हरकिसनदास हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या लिमये बिल्डिंग या चाळीत माझं बालपण गेलं. आमच्या चाळीत दरवर्षी गणपती यायचा. गणपतीच्या दोन दिवस आधी आम्ही मुलं आणि सगळे मोठे सजावटीच्या तयारीला लागायचो. आम्ही मुलं डेकोरेशनसाठी मदत करायचो. गणपती येण्याच्या आदल्या रात्री तर हमखास जागायचं असायचं. त्याची दोन कारणं. एक तर सगळे भेटायचे. गप्पांचा फड रंगायचा आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे, रात्री एक- दीडनंतर आणली जायची ती पावभाजी. खेतवाडीच्या नाक्यावर ड्रिमलँड चित्रपटगृहाजवळ रस्त्यावर 'मुमताज' नावाची ही गाडी लागायची. तिथे खूप गर्दी असायची. बटरमध्ये घोळवलेला पाव, लाल दिसणारी, पण फार तिखट नसलेली भाजी, कांदा असं सगळं असलेली ती पावभाजी खायला जाम मजा यायची. अगदी छोटीशी गाडी ती. फुटपाथवर चटया टाकून आम्ही अनेक वर्षें रात्री २-३ वाजता ती पावभाजी खाल्ली आहे. ती आपलीशी का वाटावी, तर भाज्या आणि योग्य प्रमाणात मसाला यात वर्षानुवर्ष बदल न करता राखलेली चव. त्यामुळे या भाजी बद्दल आजही आत्मीयता आहेच. गिरगावात नित्यानंद, बॉम्बे सेंट्रलला सरदार आणि व्हीटीची कॅनन पावभाजी अशीच फर्मास.
हे झालं बाहेरचं, पण घरचं म्हणाल, तर आमच्या घरी पावभाजी हा सोहळा असायचा. माझं एकत्र कुटुंब. माझी कल्पना काकू फार चविष्ट भाजी करायची. अजूनही करते. एखाद्या शनिवारी बाजारातून माझ्या आईने फ्लॉवर, सिमला मिरची असं आणलेलं दिसलं की, उद्या पावभाजी असल्याची कुणकुण लागायची. दुसऱ्या दिवशी काकू फ्लॉवर, बटाटे कुकरमध्ये उकडून घ्यायची. कांदा, सिमला मिरची, टोमॅटो बारीक चिरला जायचा. बटर-तेल एकत्र करून ते तापल्यावर त्यात कांदा मस्त परतून, टोमॅटो छान परतून मग त्यात उकडलेल्या भाज्या, मीठ, तिखट, पावभाजी मसाला असं एकत्र केलं जायचं. ते केल्यावर जो दरवळ यायचा, अहाहा... त्या सुगंधानेच आम्ही घरातले भाजी कधी होतेय, त्याची वाट बघत असू. शेवटी सिमला मिरची घालून एक वाफ दिली जायची. एकीकडे बटरवर पाव भाजण्याचं कामही सुरू असायचं. बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची, लसूण, थोडा पावभाजी मसाला घालून केलेली लालेलाल चटणी, खमंग पाव आणि गरमागरम भाजी यांच ताट समोर आल्यावर एक घास खाल्ला की, काकू तुस्सी ग्रेट हो, पावभाजी करावी तर काकूनेच. असं आम्ही काकूचं कौतुक करायचो. डोंबिवलीहून चुलत आत्ये भावंड आली की, काकूने केलेल्या पावभाजीला प्रचंड डिमांड आजही असते. आता आम्ही मुलं मोठी झालो, तरी काकूकडे आग्रहाने पावभाजीची मागणी करतो आणि आमचा तो हट्ट ती पुरवते. शाळा, कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींबरोबर तर गप्पांचे फड आजही पावभाजीच्या साक्षीनेच रंगतात. अशा कितीतरी आठवणी पावभाजीच्या सांगता येतील.
पावभाजी खाताना त्याची चव जशी महत्वाची, तसा रंगही महत्वाचा. मी काकूसारखी अशी भाजी करायचा प्रयत्न केला, तेव्हा चव बऱ्यापैकी काकूसारखी जमली, पण रंग मात्र लालसर नव्हता. मग लाल रंगासाठी एकदा बीट घातलं, पण ती मजा आली नाही. मग काकूने आणि माझी मैत्रीण शुभा प्रभू साटम हिला रंगाविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी फक्त रंग लाल येण्यासाठी त्या वापरत असलेला मसाला सांगितला. त्या मसाल्याचा वापर करून पावभाजी केल्यावर रंगाने बाजी मारली. रंगामुळे माझ्या घरातले सगळेच भाजीवर तुटून पडले. भाजीचा नेहमीचा मसाला वापरल्याने भाजी चवीला उत्कृष्ट झाली होतीच, पण आता बाजारात खूप मसाले आले आहेत. त्यामुळे असे मसाले वापरून भाजी केली. मात्र, नेहमीच्या टेस्टी भाजीची सरच त्यावेळी भाजीला आली नव्हती. अशा वेळी काय करायचं, हा विचार चालू असताना एकदम 'PSM' मसाल्याची आठवण झाली. त्यांच्या गोडा मसाल्याने मन जिंकलच होतं. म्हटलं, यावेळी पावभाजी मसाला, तिखट, हळद मागवून पाहू या. हे मसाले घरी आले, पण बरेच दिवस झााले, तरी पावभाजी करायला मुहूर्त मिळत नव्हता. गणपती झाल्यावर मुलांनी आई पावभाजी कर, असा हट्ट धरला. तो आग्रह मोडवेना. अर्थात, नेहमीसारखी पावभाजी केली, पण पावभाजी मसाला मात्र पीएसएमचा वापरला. झाल्यावर चव घेतली, तर अहाहा... माझी काकू करतेच तशी चव होती. खूप आनंद झाला. घरातल्यांना फारच आवडली. सगळ्यांनी इतक्या आवडीने खाल्ली की, भाजी कमी पडली. त्यामुळे मलाही मजा आली. 'पीएसएम'च्या पावभाजी मसाल्यामुळे अनेक आठवणी ताज्या झाल्या. जुनी चव नव्याने अशी गवसली. त्यामुळे आता मी तर 'पीएसएम'चा पावभाजी मसाला नियमित वापरणार आहे. तुम्हीही हा मसाला लवकर विकत घ्या आणि तुमच्या पावभाजीच्या आठवणी मला नक्की शेअर करा!
लेखिका- भक्ती सोमण-गोखले